$6.82
Print Length
223 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 2021
ISBN
978392374661
Weight
0.62 pound
लेखक आशिष काळकर यांनी या पुस्तकात रशिया-युक्रेन लढा अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडून युद्धाला कारणीभूत झालेली पार्श्वभूमी विस्तृतपणे चितारली आहे. त्यांनी युक्रेनच्या आजपर्यंतच्या इतिहासाचे माहितीपूर्ण विवेचन करून हा संघर्ष जागतिक ऊर्जा स्पर्धेशी कसा निगडित आहे, हा महत्त्वाचा पैलू चर्चिला आहे. दोन्ही पक्षांनी शांततापूर्ण मार्ग अनुसरुन संवादातून वादग्रस्त प्रश्न सोडवावेत अशी समतोल भूमिका भारताने घेतली आहे. या युद्धाच्या अनुषंगाने भारताचे भूराजकीय महत्त्व वाढीस लागल्याचं दिसून येतं. या गंभीर संघर्षावरील हे पुस्तक जसं समयोचित आहे तसंच ते उद्बोधकही ठरेल, असा मला विश्वास वाटतो.
– सुधीर देवरे
(भारताचे युक्रेनमधले पहिले राजदूत व माजी सचिव, विदेश मंत्रालय, नवी दिल्ली)
संपूर्ण जगावर परिणाम करणार्या युक्रेन युद्धाचा उगम, अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे मानस, युक्रेनला स्वतंत्र ठेवण्यासाठी अध्यक्ष व्होल्देमीर झेलेन्स्की यांनी चालविलेला निकराचा लढा आणि त्या निमित्ताने सुरू असलेली ऊर्जास्रोतांची खेळी इत्यादी विषयांचा या पुस्तकात लेखक आशिष काळकर यांनी घेतलेला धांडोळा खिळवून ठेवतो. त्यात इतिहासाचे निरनिराळे भू-व्यूहात्मक पदर काळकर यांनी उलगडून दाखवले आहेत. त्याच बरोबर अमेरिका, युरोप व नाटो संघटनेने रशियाच्या विघटनानंतर युरोपीय महासंघाचा झपाट्याने केलेला विस्तार पुतीन यांची झोप उडविणारा कसा ठरला, याचाही आलेख उत्तमरीत्या मांडला आहे. रशियाला सोव्हिएत काळातील पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचे पुतीन यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का? ऊर्जास्रोतांसाठी जग इतर काही पर्याय शोधेल का? अशा महत्त्वाच्या प्रश्नांचाही वेध काळकर यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे. एकंदर विषयाची मांडणी स्तुत्य व अभिनंदनीय आहे.
– विजय नाईक
(आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या वर्तुळात अनेक वर्षं कार्यरत असलेले दिल्लीस्थित पत्रकार)
0
out of 5