Imusti

  •  support@imusti.com
कुमार वयातील माझे बहिश्वर प्राण – के. जी. गिंडे

कुमार वयातील माझे बहिश्वर प्राण – के. जी. गिंडे

१९३७ सालची गोष्ट आहे. आकाशवाणीचं चेनबुकिंग मला मित्ळू लागलं होतं. प्रथम दिल्‍ली. मग ग्वाल्हेर, मग लखनौं (आणि कधी कधी कलकत्ता देखील ) असं ते बुकिंग असे. लखनौला मी मॉरिस कॉलेजचे प्रिन्सिपॉल गुरुवर्य आण्णासाहेब रातंजनकर यांच्याकडे जायचो. तिथंच दहा एक दिवस मुक्काम असे. ३७ साली गेलों असता छोटू तब्बल चार वर्षाच्या विरहानंतर तिथं दिसला. मला कोण आनंद झाला म्हणून सांगू! बालपणीची मैत्री ही काही अपूर्वच असते समानशील मित्र हा जणू बहिश्चर प्राण वाटत असतो. छोटूला बघताच आपलं काही हरवलं होतं आणि ते गवसलं याचा तर आनंद झालाच, पण संगीतात रमू इच्छिणारा, काही ध्येय बाळगलेला छोटू योग्य ठिकाणी रुज झाला आहे याचा आनंद जास्त झाला

           [हा छोटू म्हणजे आजचे पंडित के. जी. गिंडे.  कुमार त्याच्या संदर्भातच कुमारवयातील आठवणी सांगत होते. ते पुढे म्हणाले.]

          छोटूचं घर होतं बैलहोंगल या तालुक्याच्या गावी. माझे जन्मगाव सुळेभावी असले तरी आमची शेती अमटूर या खेडयात असल्यान आम्ही अमटूरला मठात रहात असू. अमटूर आणि बैलहोंगल यांमध्ये तसं फारसं अंतर नव्हतंच. माझ्या ध्वनिमुद्रिकांची यथातथ्य नक्कल करण्याचा गुण वाढीस लावण्यासाठी माझे वडील मला वारंवार बैलहोंगलला घेऊन जायचे. आणि तिथं गेल्यावर छोटूच्या घरी गेल्याशिवाय बैलहोंगलची भेट पूर्ण होतच नसे. छोटूचं घर हे  गाण्यातलं घर होतं हे याचं मुख्य कारण ! छोटू च्या वडिलांनी त्या काळात १९११ पासून नारायणराव बालगंधर्व यांचं गाणं ऐकलेलं. ते स्वतः घरीच दर गुरुवारी भजनास बसत. ज्येष्ठ चिरंजीव रामभाऊ गिंडे ( हेच पुढे शल्यविशारद डॉ. गिंडे झाले) दिलरुबा वाजवीत. त्यांच्याहून धाकटे गोविंदराव तबला वाजवीत. आपल्या घरात कुणीतरी गायक कलावंत व्हावा असं सर्वांना वाटे. पण विशेषत: रामभाऊ गिंडे यांना. त्यांनी त्या दष्टींनं छोटूचं मन नाट्यसंगीतात गुंतवलं होतं. आमचं घर देखील गाण्यातलंच होतं. (माझी आई नाट्यगीते गायची. माझा मामा गाणारा, वडील तर गाणारे होतेच.) तेव्हा गिंडे आणि कोमकली यांचे ऋणानबंध निकटचे बनणं अपरिहार्य होतं. बैलहोंगलला त्यावेळी मोगूबाईच्या पासून ते पंडिराव नगरकरांपरय॑त सर्वांच्या ध्वनिमुद्रिका येत. पंडित नारायणराव व्यास यांच्या सर्वात अधिक. त्यां ध्वनिमुद्रिका या छोटूच्या धूळपाटया होत्या. माझे साक्षात्कार होते. [जरा थांबून कुमार पुढे सांगू लागले.]

          छोटूबाबत एक गोष्ट मला आवर्जून सांगितली पाहिजे ती ही की, अगदी प्रथम त्याला मी जेव्हा गाताना ऐकलं तेव्हा मला त्याचा हेवाच वाटला. तो चक्‍क तबल्याच्या साथीत गात होता. मला तोपर्यंत तबल्याच्या साथीत गाता येत नव्हतं. १९३१-३२ सालातील ही गोष्ट आहे. माझं वय त्यावेळी ७ वर्षाचं मानलं तर छोटू माझ्याहून दीड वर्षाने लहान म्हणज साडेपांच वर्षांचा. अर्थात्‌ त्यावेळी तो माझ्याहून इतका लहान हे मला ठाऊक नव्हतं. या षष्ठ्ब्दीच्या निमित्तान प्रथम ती कल्पना आली. छोटू हा अंगापेरानं पहिल्यापानच मजबूत. त्यामुळं तो माझ्याहून मोठा आहे असंच मला वाटायचं. छोटू्ला गायक बनवायचं हे ध्येय त्याचे ज्येष्ठ बंधू रामभाऊ यांनी मनात बाळगलेलं होतं, तर मला प्रकाशझोतात आणावं, थोर गवयानं शिष्य म्हणून पत्करावं यासाठी छोटू्चे वडील खटपटीत असत. (एकदा अशी संधी आली. मलप्रभा नदीच्या काठी गुर्लहोसुर म्हणून गाव आहें. तिथं चिदंबरम्‌ स्वामींचा उत्सव प्रतिवर्षी होई. छोटू्चे वडील त्या मठाचे विश्वस्त. त्या वर्षीच्या उत्सवात वझेबुवा सेवेला येणार हे समजताच छोटू्चे वडील मला गुर्लहोसुरला घेऊन गेले. गंमत अशी की तो मठ होता वैष्णव संप्रदायाचा आणि मी कट्टर शैव. तेव्हा माझं शैवपण लपविण्यासाठी छोटूच्या वडिलांनी मला गळ्यापर्यंत बटणं लावावयास सांगितली. वझेबुवांना मी त्यांचीच ‘बोलरे पपीहरा’ ही ध्वनिमुद्विका सहीसही ऐकविली. वझेबुवा चकित झाले, पण छोटू्च्या वडिलांच्या मनातील हेतू काही पार पडला नाही.) मी हा किस्सा एवढ्यासाठी सांगितला की, छोटूच्या वडिलांना छोटूपेक्षाही माइ्या भवितव्याची काळजी अधिक होती हे कळावे.

          मला वाटतं ३३-३४ सालापासून माझा छोटूशी संबंध तुटला. मी एका वेगळ्या वातावरणात वाढू लागलो. (३५ साली कलकत्ता आणि कानपूर इथं कीर्तीचा महापूरच माझ्यावर आला आणि ३६ सालच्या फेब्रुवारीत गुरुवर्य देवधरांकडे मी दाखल झाल्यावर गुरुवर्य आण्णासाहेब रातंजनकर एक दिवशी देवधरांकडे आले. ३६ सालच्या मे महिन्याच्या सुट्टीत ते बहुधा लखनौहून मुंबईत आले असावेत. माझी त्यांच्याकडे ये-जा सुरू झाली. तरी देखील छोटू त्यांच्याकडे येणार आहे या गोष्टीचा मला पत्ता लागला नाही. निवांत असलो म्हणजे त्याची आठवण यायची. पण त्याचं पुढे काय झालं ? त्याच्यासाठी त्याचे थोरले बंधू अण्णासाहेबांकड़े प्रयत्नशील आहेत की काय वगैरे संबंधी मला काहीही ठाऊक नव्हते. माझ्या पालक मंडळींनाही त्याबदल विचारायची सोय नव्हती. सगळे एकाहून एक जमदग्नी ! त्यामुळे छोटू १९३६ च्या मे अखेरीस अण्णासाहेबांकडे आला केव्हा आणि पुढ़े जुलैत लखनौस गेला केव्हा हे मला काहीही कळलं नाही. ३७ साली जेव्हा मीच लखनौंत गेलो तेव्हा तो चार वर्षांनंतर प्रथम दिसला आणि आमच्या स्नेहाला पुन्हा भरते आले. एक बहिश्चर प्राण पुन्हा गवसल्याचा आनंद झाला.

          देवधरांकडे आल्यावर मला आणखी एक बहिश्चर प्राण मिळाला, तो म्हणजे बंडू जोग. आजचा विख्यात व्हायोलिनिस्ट व्ही. जी. जोग तो हाच. देवधरांचा क्लास त्यावेळी बनाम हॉल लेनमध्ये होता. तिथं बंडू व्हायोलिन शिकत असे. पुढ लखनौहून अण्णासाहेबांती देवधर मास्तरांकडे मागणी केली की, मॉरिस कॉलेजला एक व्हायोलिन शिक्षक हवा आहे. तेव्हा माझा हा बहि:श्चर प्राणही लखनौला गेला. चेनबुकिंगचं निमित्त साधून लखनौं आणि ग्वाल्हेर या दोन ठिकाणी रहावयास मिळे याचं मला जास्त आकर्षण होतं. ‘नित्य नवे काहीतरी संपादावे’ हे सूत्र त्यावेळीही माइया नजरेसमोर असे. यादृष्टीने ग्वाल्हेरीस राजाभय्या पूँछवाले आणि लखनौस अण्णासाहेब ही ठेहराव ठिकाणंच होती म्हणाना त्या दोघांनाही मला भरभरून द्यावे असं वाटायचं आणि मलाही घ्यावं असं वाटायचं. गुरुवर्य अण्णासाहेबांनी त्यांच्या हस्ताक्षरात त्यांनी बांधलेल्या बंदिशी लिहून द्याव्यात आणि मी त्या कागदावरील शाई वाळावयाच्या आत मुंबई रेडिओ-केंद्रातून त्या ऐकाव्यात, असेही कित्येकदा घडलेले आहे. सालग-वराळीमधील अण्णासाहेबांची बंदीश सबंध देशाला मी अशीच मुंबई केंद्रावरून ऐकविली. त्यावेळी मुंबई केंद्र भारतभर ऐकले जायचे. कारण बहुतेक सर्व चांगले कार्यक्रम याच केंद्रावरून व्हायचे.

           लखनौ आणि ग्वाल्हेर येथे मी रमे, याची आणखीही कारणे होती. माइ्या दोन बहिश्चर प्राणांचा मी वर उल्लेख केला. आणखी तीन बहिश्चर प्राण मला मिळाले ते लखनौलाच. एस. सी. आर. भट, सदाशिव गुरव आणि दिनकर कैकिणी. दिनकर सर्वात लहान. सदाशिव हा उत्तम तबलापटू होता. माझी अनेक गाणी त्यानं वाजवली आहेत. आज तो हयात नाही याचं मला दुःख होतं आणि भट यांच्याबइल मी काय सांगू? अहर्निश अभ्यासात रमलेला, एकाच वेळी       विनीत विद्यार्थी आणि उत्तम अध्यापक या भूमिका सांभाळणारा असा मित्र मला लखनौला लाभला हे मी माझं भाग्य समजतो. भट आणि जोग दोघंही एका खोलीत राहात. मॉरिस कॉलेजच्या जवळच त्यांची खोली होती. माझा मुक्काम त्या खोलीवरच असे. संध्याकाळचा फेरफटका आटोपून आम्ही यायचों व लगेच तंबोरे काढून बसायचो. मध्यरात्र होईपर्यत आवृत्ती चाले. देवाणघेवाण होई. तिथून मग जेवण. त्यानंतर अंथरुणास पाठ टेकीत अस्‌. या कार्यक्रमात छोटू नसे. तो अण्णासाहेबांकडे असे. त्यांचा पी. ए. ही तोच. सगळे हिशेबठिशेब तोच ठेवी. पण अण्णासाहेबांचे आणि भटांचे छोटूला सतत मार्गदर्शन असे. छोटूचा दृष्टिकोण गंभीर बनायला कारणीभूत आहेत भट. अण्णासाहेबांचे गाणे कसे समजून ध्यावे याचे मार्गदर्शन करणारे भटच. |

          ग्वाल्हेर काय किवा लखनौं काय, अण्णासाहेब, राजाभय्या ही मंडळी मी लहान म्हणून माझे लाड करीत. आमचा तांडा सिनेमाला जात असे. मला भाड्यानें सायकल घेऊन देत. किती म्हणून सांगावे ! या मंडळींचा माझ्या बाबतीत परकेपणा असा नव्हताच.

          उन्हाळ्याच्या सुट्टीत अण्णासाहेब दीड महिना मुंबईस येत तेव्हा पुन्हा हे सर्व बहिःश्चर प्राण एकत्र येत. रविवारी सकाळी आणि संध्याकाळी अण्णासाहेब गायला बसत, तेव्हा भट, मी, जोग, छोटू असे सर्व असायचोच. ती संधी घालवायची नाही म्हणून मी बेळगावला जाणेही रद्द केले. यामध्ये अण्णा साहेबांकडून नकळत आमचे केवढे तरी शिक्षण होऊन जायचे. त्याशिवाय प्रत्यक्ष चर्चेतून होत असे ते वेगळेच. अण्णासाहेबांचा स्वर बारीक पण अति सुरेल. सारंगिये देखील वचकून असत. रागप्रभुत्व कमालीचे. वादवच नाही. आणि विश्लेषण इतके छान करीत की सांगून सोय नाही. उत्तम बंदिशी अशी बांधत की, पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांनीही एकदा पंचम रागातील विलंबित बंदीश करून द्या अशी विनंती माझ्या करवी अण्णासाहेबांकडे केली. ‘चंद्र जाके भाल’ ही विलंबित बंदीश या विनंतीतून निर्माण झाली. त्या आधी मी “आवो गावो गावो रे’ ही द्रुत तेवढीच गात असे.

         भट आणि गिंडे या जोडीचा अभिमान मला अनेक कारणांसाठी आहे. एक तर कलेच्या क्षेत्रात जी बदमाषी चालते तिच्यापासून ते अलिप्त आहेत. शिवाय पूर्ण ज्ञानी आहेत. मला कुणी एखादा कूटप्रश्न विचारला तर मी त्या माणसाला या दोघांकडें धाडतो. समजावून देण्याचा, पटवून देण्याचा गुरुवर्य अण्णासाहेबांचा गुण यांनी सही सही उचलला आहे. गुरुशी इमान राखण्यासाठी प्रसंगी चांगली नोकरी सोड़्न द्यावी लागली तरी द्यायची हा स्वाभिमान छोटूने दाखविला आहे आणि मित्रप्रेमासाठी आपली अर्धी भाकरी मोडून प्रथम मित्राला द्यायची हे भटांनी दाखविले आहे. या दोघांनाही वललभ संगीत विद्यालय ६० आणि ६३ सालापासून लाभले हा त्या विद्यालयाचा मोठाच लाभ झाला आहे.

          छोटू मंच कलाकर होण्याच्या, एक परफॉर्मिंग आर्टिस्ट होण्याच्या ध्येयाने या कलाक्षेत्रात आला आणि एक थोर शिक्षक हे त्याचे पहिले धिरुद बनले याबदल त्याने उगाच’ खंत करू नये. परफॉर्मिंग कलाकार ठरवून होतोच असे नाही आणि तो झाला तरी त्याच्यातील शिक्षक नाहीसा होता नये. शिक्षक म्हणून मोठं होणं हेही कमी नव्हे. गिंडे, भट हे त्याअर्थाने अधिक मोठे आहेत. सहज हिशेब केला तर दोन हजार बंदिशी दोधांनाही मुखोद्गत आहेत. मला वाटतं दिनकरच्याही जवळजवळ तितक्याच. कधी एखादी बंदीश आठवली नाही तर मी सरळ त्रयीपैकी कुणाला तरी फोन करतो आणि मंच कलाकार म्हणूनही यांची योग्यता कमी नव्हे. कित्येकदा मी पाह्मलंय, भट-गिंडे ही जोडी, ही दोन डिपेल इंजिन तापली म्हणजे अप्रतिहत गतीनं आणि बुद्धिप्रभावानं मैफिलीचा संपूर्ण कब्जाच घेतात. छोटूस आता छोटू म्हणणं योग्य नव्हे. कृष्णा ही खाजगीतील हाक झाली. पण मास्या- सारख्या गेली ५० हून अधिक वर्ष मैत्री टिकलेल्याच्या मुखात डॉ. के. जी. गिंडे हे शब्द कसे यावेत ? छोटूस यापुढेही संगीत सेवेसाठी प्रदीर्ध आयुरारोग्य लाभो असंच मी म्हणणार.